Saturday, February 6, 2016


ज्युलियन असांज शोधपत्रकार की आणखी कुणी तरी?
वसंत गणेश काणे 
     साडे आठ लक्ष गुप्त कागदपत्रे उजेडात आणणारा, अनेक बड्या धेंडांचे व देशांचे वस्त्रहरण करणारा, १३२६ दिवस इक्वेडोरच्या वकिलातीत १९५ चौरस फूट जागेत आपले कार्यालय व निवासस्थान थाटणारा, रात्रंदिवस वेढा घालून बसलेल्या ब्रिटिश पोलिसदलावर ब्रिटनला लक्षावधी पाऊंड खर्च करायला लावणारा, दोन चित्रपट व एक डाॅक्युमेंटरी यांच्या निर्मितीला कारणीभूत झालेला, चित्र व पत्रसृष्टीतील दिग्गजांचा स्नेह संपादन करणारा जुलियन असांज नक्की आहे तरी कोण? जागल्या( व्हिसल ब्लोअर)? चोर? बलात्कारी ? की आणखी कुणी ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, इक्वेडोर, फ्रान्स व युनोची समिती या सगळ्यांच्या भूमिका नुसत्या समजूनच नव्हे तर तपासून पहाव्या लागतील. खरे तर हे काम पोलिसांचे किंवा न्यायव्यवस्थेचे. पण शेवटी प्रत्येकाच्या मनात एक विक्रमादित्य असतोच की. तो स्वत:ही आपले मत बनवीत असतो. ब्रिटनमधील ४४ टक्के लोकांना हे सर्व प्रकरण बनावट व कुभांड स्वरूपाचे वाटते आहे. पण विषय समजून घेण्यासाठी सगळी हकीकत सुरवातीपासून क्रमश: समजून घ्यावी हे बरे. 
  जुलियन असांज हा आॅस्ट्रेलियन नागरिक स्वत:ला शोध पत्रकार म्हणवतो व अनेकांच्या मते तो तसा आहे सुद्धा. एक गाजलेला सायबर योद्धा व विकिलिक्स नावाच्या संकेतस्थळाचा तो संपादक आहे.  अनेक बडी राष्ट्रे विशेषत: अमेरिका गेली पाच वर्षे त्याच्यामागे हात धुवून लागली आहेत. अमेरिकेचे दुहेरी मापदंड असतात, असा या देशावर आरोप आहे. सभ्य, सुसंस्कृत, व्यक्तिस्वातंत्र्यवादी हा अमेरिकेचा एक चेहरा आहे. हा  बुरखा खोटा आहे, हे जुलियन असांजने दाखविले. ‘हा माझा गुन्हा (?) आहे’,  असे अमेरिका मानते, अशी जुलियन असांजची भूमिका आहे. विकिलीक्स हे त्याचे संकेतस्थळ! अमेरिकी सरकारची गोपनीय माहिती त्याने जगजाहीर केली. अमेरिकेच्या दूतावासांनी पाठविलेले संदेश, पत्रे, इराक आणि अफगाणिस्तानातील लष्करी कारवाईच्या संबंधातील गुप्त दस्तऐवज, चित्रफीत हे सर्व त्याने उघड केले व जगभर अमेरिकेची छी थू झाली. त्याच्या एका साथीदाराला - ब्रॅडली तथा चेल्सी मॅनिंगला- पकडून अमेरिकेने ३५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दुसरा साथीदार एडवर्ड स्नोडेन शिताफीने निसटला व रशियाने त्याला आश्रय दिल्यामुळे  बालबाल बचावला.
असांज स्वीडनमध्ये
 असा हा असांज स्वीडनमध्ये आला. दोन महिलांनी त्याला देशातील निरनिराळ्या कार्यक्रमात जनतेसमोर उभे करून त्याचा परिचयही करून दिला. पाश्चात्यांमध्ये स्त्री पुरूष संबंध किती सैल व स्वैर आसतात, हे सांगायला नको. आपण सुरक्षित संभोगाला संमती दिली असतांना कंडोम न वापरून (किंवा तो मुद्दाम फाडल्यामुळे म्हणा) आपली फसवणूक झाल्याचा एकीचा आरोप आहे. तर दुसरीचे म्हणणे असे आहे की, त्यावेळी आपण झोपेत होतो आणि याचा गैरफायदा असांजने घेतला व असुरक्षित संभोग केला. बेशुद्ध अवस्थेत, झोपेत किंवा नशेत असतांना फसवून संभोग करणे हा स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो. सुरवातीला बलात्काराचा आरोप होता, पण तो टिकला नाही म्हणा किंवा आणखी काही म्हणा पण फसवून असुरक्षित संभोग केला व एस टी डी चाचणी करण्यास (लैंगिक रोग आहे किंवा कसे हे तपासण्यास) नकार दिला, हे आरोप आता त्याच्यावर आहेत. हाही स्वीडनमध्ये गुन्हा मानला जातो पण बलात्काराच्या तुलनेत हा सौम्य स्वरूपाचा गुन्हा मानला जातो, तरी त्यासाठी सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा आहे. यापैकी एकीने यू टर्न घेत असे काही घडलेच नाही, असे म्हटले आहे. असांजला फसवणुकीचा मुद्दा सोडल्यास बाकी घटनाक्रम मान्य आहे. जे झाले ते उभयपक्षी संमतीनेच झाले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण हा सगळा ‘हनी ट्रॅप’ चा (खोट्या आरोपाखाली अडकवण्यासाठी सुंदरीचा वापर करणे) प्रकार आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण तरीही तो स्वीडनच्या पोलिसांना शरण जाण्यास व खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे. पण अमेरिकेच्या स्वाधीन करणार नाही, अशी जाहीर हमी स्वीडनने द्यावी, अशी त्याची मागणी आहे. अशी हमी देण्यास स्वीडन तयार नाही.
  ब्रिटिश न्यायालयांकडून दिलासा नाही पण इक्वेडोरची साथ.
   गुपचुप ब्रिटनमध्ये आल्यानंतर ब्रिटनही त्याच्या मागे लागले. त्याला प्रथम ताब्यात (डीटेन) घेण्यात आले. आपल्याला हद्दपार करू नये, यासाठी असांज ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढला पण केस हरला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मोठ्या शिपाफीने गुंगारा देऊन त्याने इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रय मिळवला. ब्रिटनने वकिलातीला वेढा घालून असांजला आमच्या स्वाधीन करा, म्हणून इक्वेडोरला प्रथम सांगून व नंतर धमकावून सुद्धा पाहिले. आम्ही वकिलातीत घुसून असांजला अटक करू शकतो, अशी दर्पोक्तीही करून पाहिली. पण इक्वेडोर टसचे मस व्हायला तयार नाही. दक्षिण अमेरिकेत तुमचे व्यापारी संबंध आहेत, हे विसरू नका, असे सुनवण्यासही त्यांनी कमी केले नाही. स्वीडिश अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करू द्या, अशी मागणी केली होती पण दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची होऊन हा प्रयत्न फिसकटला. असांज गेली तीन साडेतीन वर्षे एकप्रकारे इक्वेडोरच्या वकिलातीत पण ब्रिटनमध्येच एकप्रकारे नजरकैदत आहे. सध्या विनयभंगाचा दावा दाखल करण्याची मुदत निघून गेली आहे.आणखी पाच वर्षे गेली तर तर बलात्काराचा दावाही करता यायचा नाही. पण या नजरकैदेचा असांजच्या प्रकृतीवर  परिणाम होतो आहे. त्याची रया पार गेली आहे. पण पीळ मात्र कायम आहे. असांजने फ्रान्सकडेही आश्रयासाठी विनंती केली होती. पण तुझ्यावर वाॅरंट आहे, त्यामुळे तुला आश्रय देण्यास आपण असमर्थ आहोत, असे म्हणून फ्रान्सने अंग झटकले आहे.
 संयुक्त राष्ट्रसंघाने दिली साथ
  ब्रिटनची कृती प्रत्यक्षात नजरकैद करण्यासारखीच आहे,त्याला मुक्त करावे, असा अभिप्राय संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका पाच कायदेपंडित सदस्यांच्या मानवाधिकार समिताने (वर्किंग ग्रुप आॅफ आर्बिट्ररी डिटेनशन)  तीन विरुद्ध एक अशा मताधिक्याने दिला आहे. तसेच त्याला ब्रिटन व स्वीडन कडून नुकसानभरपाईही मिळावी, असे म्हटले आहे. एकीने मत दिले नाही कारण ती स्वत: असांजप्रमाणे आॅस्ट्रेलियन आहे. या समितीत मालदिवचे लोकशाहीवादी माजी अध्यक्ष महंमद नाशीद, म्यानमारच्या झुंझार व लोकशाहीवादी नेत्या आॅंग सान स्यू की यांचा समावेश होता. हा निकाल बाहेर येताच असांज गॅलरीत आला आणि त्याने चर्चिलप्रमाणे दोन बोटांनी व्ही' अक्षरासारखी खूण केली व प्रेक्षकांनी एकच जल्लोश केला.आंतरराष्ट्रीय कायदे व नीतीनियम धुडकावून अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला पिडले जात आहे काय, याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाची ही समिती घेत असते व आपला अभिप्राय देत असते. या समितीचा अहवाल अर्थातच संबंधित देशावर (ब्रिटन) बंधनकारक नसतो. स्वीडन हा निकाल अमान्य केला व ब्रिटनने त्याची ‘हास्यास्पद’, अशा शब्दात संभावना केली. या समितीने आपल्याला दोषी ठरवले तर आपण शरणागती पत्करू, असे असांजने जाहीर केले होते. ‘आतातरी मला जाऊ द्या’, असे आवाहन असांजने ब्रिटन व स्वीडनला केले आहे.  
   जनतेच्या दरबारात असांज 
  असांज इक्वेडोरच्या वकिलातीतून बाहेर पडताच ब्रिटिश पोलिस त्याच्यावर झडप घालणार हे नक्कीआहे. हा स्वत:हून अटक टाळतो आहे, त्याच्यावरील वाॅरंट पाहता त्याला स्वीडनला हस्तांतरित करणे, ही आमची कायदेशीर जबाबदारी आहे, अशी ब्रिटनची भूमिका आहे.असांजने तर अमेरिकेची अब्रूच चव्हाट्यावर आणली आहे. ती काय वाटेल ते झाले तरी त्याला मोकळे सोडणार नाही. त्याच्यावर बलात्काराचा/निदान विनयभंगाचा/ नाही काही तर फसवणुकीचा आरोप आहे. पण हा नुसता आरोपच आहे. त्याची बाजू अजून ऐकली गेलेली नाही.  असांजवर आंतरराष्ट्रीय वाॅरंट आहे. त्यामुळे त्याला पकडणे हे आपले कर्तव्यआहे, असे ब्रिटनला वाटते. ते चूक म्हणता येणार नाही. एखाद्याला संपवायचे असेल तर त्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला दहशतवादी ठरवायचे, हा जगातील रूढ शिरस्ता आहे. असांजला अशी अद्दल घडवायची की, शोधपत्रिकारितेचा नाद निदान निम्या लोकांना तरी  सोडून द्यावासा वाटला पाहिजे, असाही बड्या राष्ट्रांचा उद्देश असू शकतो. खरे काय आहे कुणास ठावूक? पण निदान आजतरी जनमत असांजच्या बाजूचे आहे.

Sent from my iPad

No comments:

Post a Comment