Wednesday, February 3, 2016


देवमाशाच्या(व्हेल) नगरी जाऊन

     बोस्टन या गावी व्हेल (देवमासा) वॅाचिंगसाठी प्रत्येकी चाळीस डॅालर याप्रमाणे तिकिटे काढून आम्ही आलो तेव्हा 'बोस्टन टी पार्टी' साठी प्रसिद्ध असलेले हेच ते गाव हे गावीही नव्हते. याच ठिकाणी अमेरिकन लोकांनी इंग्लंडहून जहाजातून आलेली चहाची खोकी समुद्रात फेकून अवाजवी कराबद्दल वाटत असलेला संताप व्यक्त केला होता. १६ डिसेंबर १७७३ ची ही घटना आहे. पाण्याला अजूनही चहाचा रंग आहे का हे डोकावून पाहिले पण पाणी काळसर गढूळ दिसले आणि माझे मलाच हसू आले. मग लक्ष गेले बोटीकडे. कॅटॅमॅरन प्रकारची आमची बोट होती. इतर बोटींच्या आणि काही जहाजांपेक्षाही ही जास्त वेगाने पाणी कापते, असे ऐकले होते. बोस्टन बंदराजवळचे पाणी काळसर होते. पण तरीही घन आणि द्रव कचरा पाण्यात टाकण्यास सक्त मनाई असल्यामुळे पाणी बरेच स्वच्छ होते. अनेक जेली फिशेस तरंगतांना दिसत होते. यांच्या  शरीरातील द्रव  बय्राच प्रमाणात रंगहीन आणि जवळजवळ पाण्याइतकाच घनतेचा असल्यामुळे तसेच पाणी गढूळ असल्यामुळे हे प्राणी चटकन दिसत नाहीत. समोर पहावे तर विमाने हवेत भरारी घेतांना किंवा विमानतळावर उतरतांना दिसत होती. कारण पलीकडेच विमानतळ होता. बरोबर दहा वाजता बोटीचा परंपरागत भोंगा वाजला आणि आमचा जलप्रवास सुरू झाला. हवा गार होती, त्यामुळे वारा झोंबत होता. लाटा जसजशा मोठ्या होत गेल्या तशी बोट वरखाली होत गेली आणि डोलूही लागली. बोटीत चालणे कठीण होऊन बसले. एवढ्यात एका कर्मचार्याने लहानग्या अनुषासमोर एक प्लॅस्टिकचा डबा आणून ठेवला त्यात एक जाडजूड वही आणि व्हेलचे चित्र काढण्यासाठी रंगाच्या कांड्या होत्या. डब्यावर सूचना होती, 'प्रोटेक्ट दी सी'.
       व्हेल दिसणार की नाही?
        बोटीच्या कप्तानाने आमचे सगळ्यांचे स्वागत केल्यानंतर निवेदकाने माहिती दे ण्यास सुरवात केली. आज हवामान चांगले आहे. त्यामुळे आपल्याला व्हेलचे दर्शन घडेलच. पण दुर्दैवाने ते न धडल्यास आपण याच तिकिटावर उद्या, परवा, आठवड्याने एवढेच नव्हे तर येत्या दहा वर्षात केव्हाही व्हेल पाहण्यासाठी येऊ शकता! अशी हमी तो देत होता कारण व्हेल दिसणारच, अशी त्याला खात्री होती. पाण्यात राहणारा तो मासा असा आपला सर्वसाधारण समज असतो. म्हणून व्हेल या सस्तन प्राण्याला मासा समजणे समजू शकते पण देवमासा हे नाव का पडले असावे, हा विचार मनात येत होता. ब्ल्यू व्हेल हा आजवर होऊन गेलेल्या सर्वात मोठ्या डायनोसार  प्राण्यापेक्षाही मोठा असू शकतो. म्हणून कदाचित याला देवमासा असे नाव पडले असावे, असे वाटले.
व्हेल पहायचा कसा?
   'व्हेल दिसण्यापूर्वी तीन गोष्टी दिसतात', निवेदक सांगत होतात. 'श्वास  बाहेर टाकतांना हवेबरोबर व्हेल पाण्याचा फवारा उडवतो. तो पाच मैल दूर अंतरावरून दिसू शकतो. एकदा श्वास घेतल्यानंतर तो २० मिनीटे पाण्याखाली राहू शकतो. दम लागला की मात्र दर पाच मिनिटांनी त्याला श्वास घेण्यासाठी  पृष्ठभागावर यावे लागते. म्हणून शिकारी त्याला अगोदर थकवतात. त्यामुळे   शिकार करणे सोपे होते. दुसरे म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरून पक्षी उडतांना दिसू लागतात. कारण व्हेल आणि हे पक्षी यांच्या भक्षाची जातकुळी सारखीच असते. तिसरे असे की, आपल्या बोटीसारख्या बोटी दिसायला लागतात. कारण त्या याच कामासाठी आपल्या थोड्या अगोदर आलेल्या असतात.
   व्हेल बोटीच्या जवळ येत नाहीत. पण आईसोबत येणारे बच्छडे कधीकधी कुतुहल म्हणून बोटीजवळ येऊ लागले तर त्याची आई बोट आणि बच्छडे यांच्यामध्ये येऊन पोहू लागते. पण कुणी एखादे अगाऊपणा करून बोटीकडे येऊ लागले तर अडवते तरीही हेका कायम ठेवल्यास फटका सुद्धा मारते. 'खुटी उपाडपणा करणारं कारटं' आणि वैतागलेली आई यांच्यात जसा संवाद घडतो तसेच काहीसे यावेळी घडत असावे.
प्रत्येक व्हेलचे वेगळेपण
  प्रत्येक व्हेल वेगळा असतो/दिसतो. हा वेगळेपणा लहानपणी शत्रूंनी तोडलेल्या लचक्यांमुळे, इतर जलचरांशी झालेल्या संघर्षात झालेल्या जखमांमुळे येत असतो तर काहींची जहाजांशी टक्कर होते आणि खरचटल्याच्या खुणा कायम असतात आणि ओढवलेल्या प्रसंगाची साक्ष पटवण्याबरोबरच ओळखही पटवतात. एकदा तर एका व्हेलच्या मागच्या शेपटाचा अर्धा भागच तुटला होता, अशी एका निरीक्षकांची नोंद आहे. म्हणजे  राणा संगाच्या शरीरावर लढाईत झालेल्या एेंशी जखमा होत्या, असे जसे म्हणतात, तसेच हे झाले. राणा संग काय फक्त माणसातच असावा? तो व्हेल मध्येही असणारच. तसे पाहिले तर 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग', ही काव्यपंक्ती सर्वच प्राणीमात्रांना लागू पडते. अर्थात संत तुकाराम महाराजांना जाणवणारे युद्ध वेगळे होते.
     हंप बॅक व्हेल
   व्हेलच्या अनेक जाती आहेत. ब्ल्यू व्हेल हा सर्वात मोठा तर आहेच पण  अगोदर म्हटल्याप्रमाणे तो एकेकाळच्या सर्वात मोठ्या डायनोसारपेक्षाही तो मोठा असू शकतो. आम्ही अटलांटिक महासागरातील 'हंप बॅक' व्हेलची भेट घेण्यासाठी निघालो होतो. याच्या पाठीवर कुबड असल्यासारखे दिसते. हे चरबीमुळे आलेले असते. बुडी मारताने जी कमान दिसते ती यामुळेच.  यांचे संपूर्ण जीवनचक्र पाण्यातच पूर्ण होत असते. सील हा प्राणी प्रजोत्पादनासाठी जमिनीवर येतो. व्हेलचे असे नाही.
     व्हेलमधील बालसंगोपन
    यांचे प्रजोत्पादन समुद्रातच होते. गर्भारपण १२ महिन्यांचे असते. एका वेळी एकच बछडे जन्मते. ते १८ महिनेपर्यंत अंगावरच पीत असते. बच्छडे आईच्या पोटातून बाहेर येताच आईच्या स्तनाचा शोध घेते. तो गवसताच त्याचे तोंड आईच्या स्तनाग्रावर बाटलीच्या बुचाप्रमाणे घट्ट बसते. त्याला या नंतर दूध ओढून पिण्याचे कष्ट घ्यावे लागत नाही. इंजक्शन देताना जसा त्या लहानशा  पिचकारीतून औषधी द्रव आपल्या शरीरात जातो तशासारख्या प्रकारे आई बच्छड्याच्या मुखात दुधासारख्या पदार्थाची धार सोडते. हे दूध घट्ट म्हणजे म्हणजे टूथपेस्ट इतके धट्ट असते. दूध पिऊन तृप्त झाली की बच्छडे आई पासून दूर होते. बछड्याची वाढ हळूहळू होते. ते आईच्या सोबतीने पोहू लागते. तसेच ते वयातही उशीरा येत असल्यामुळे यांची प्रजाही धीम्या गतीने वाढते.
व्हेल आवाज काढू शकतात. निरनिराळे संदेश देण्यासाठीच्या आवाजाची तह्रा वेगवेगळी असते. अभ्यासकांना एक घायाळ बच्छडे आढळल्याची नोंद आहे. मानव आणि जलचर शत्रूंमुळे त्याला जखमा झाल्या होत्या. त्याच्या फासळ्या उघड्या पडल्या होत्या. या अवस्थेत आई त्याची शुश्रुषा करीत होती. त्याची सोबत करीत होती. माय लेकरात संवाद सतत सुरू असतो. प्रियाराधनातही संवाद असतोच. दृष्टी, श्रवण आणि स्पर्श यांचे ज्ञान व्हेलला नक्कीच आहे. व्हेलना बाह्यकर्ण नाहीत पण तरीही त्यांचे कान चांगलेच तिखट असतात. काही बोटी अतिशय कमी आवाज करणाय्रा असतात, त्यामुळे मात्र त्यांचा गोंधळ उडतो. सामान्यत: व्हेल बोटींच्या वाय्रालाही उभे राहत नाहीत. ते लांब पोहत जातात. चव आणि वासाच्या ज्ञानाबद्दल अजून सर्वमान्य मत तयार झालेले नाही. त्यांची स्मरणशक्ती बय्रापैकी असते. ओळख पाळख ठेवणे, अनुभवातून शहाणे  होणे या क्षमता त्यांच्यात आहेत.
व्हेलच्या शिकारीवर बंदी
     १८९३ मध्ये व्हेलच्या हत्येवर बंदी घालण्यात आली.पण काही राष्ट्रे ही बंदी मानायला तयार नाहीत. यांच्या कातड्याच्या ढाली व बूट तयार केल्या जात. पण भरपूर मांस देणारा म्हणूनच याची प्रामुख्याने शिकार केली जायची. लाकडात कोरलेली डोंगी वापरून शिकारी लालूच दाखवत त्याच्या जवळ जाऊन त्याला दचकवीत आणि अणकुचीदार व लांब दांडू त्याच्या डोक्यात खूपसत असत. यावेळी धडपड करतांना तो अनेकदा उताणा व्हायचा. शिकाय्राला आता त्याची शिकार करणे सोपे व्हायचे. कोलंबसाच्या रोजनिशीत या विषयीची नोंद सापडते. मोठ्या जहाजांची धडक लागून अनेकदा व्हेलचे दोन तुकडे झाल्याची उदाहरणे आहेत. शिकाय्रांच्या आघातांमुळे विद्रुप झालेले व्हेलही काही कमी नाहीत. काही अंशी खुद्द व्हेलही यासाठी कारणीभूत आहे. तो सामान्यत: मंद गतीने ( ताशी ३/४ मैल)पोहतो. पण प्रसंगी ताशी ३० मैलापर्यंत धावू ( नव्हे पोहू ) शकतो.  तसेच त्याचे कुतुहलही त्याला जहाजे, मानव, समुद्रातील तारा, तरंणारे तसेच अर्धवट बुडालेल्या वस्तू यांच्याजवळ जाण्यास प्रवृत्त करते. यामुळे एकतर शिकार तरी होते नाहीतर अपघात तरी होतात. अति उष्णता, अतिशय थंडी आणि रोगप्रादुर्भाव हेही शत्रूच म्हटले पाहिजेत.


     व्हेलचे अन्नभक्षण
      बोटीवर माहिती देण्यासाठी प्रतिनिधी नेमले होते. एकाने व्हेलचा दात आणून दाखविला. एका बाजूला दाते असलेला दात होता. फणीला दाते असावेत तसे पण नरम दाते दाताला असतात. व्हेल समूहाने किंवा एकेकटे शिकार करतात. श्वसन करतांना जो फवारा निर्माण होतो त्यानंतर हवेचे बुडबुडे तयार होत असतात. सगळे व्हेल मिळून अशा बुडुबड्यांचे सुमारे ५० मीटर व्यासाचे वर्तुळ तयार करतात. या वर्तुळात अडकलेले जलचर अर्थातच भांबावलेले असतात. आता 'आ' वासून ते पाणी तोंडात घेतात. नंतर जबडा बंद करून पाणी बाहेर टाकतात. दात पाणी गाळण्याचे व भक्ष थोपवण्याचे काम करतात. फक्त पाणी बाहेर जाते. पाण्यासोबत आलेले जलचर प्राणी  व वनस्पती मात्र तोंडात अडकून पडतात. आता ते गिळंकृत होतात. पाण्याचा एक थेंबही पोटात जात नाही. व्हेल एक थेंबही पाणी पीत नाही. त्याची निर्जळी जन्मभर सुरू असते. त्याच्या भक्षातूनच त्याची अन्नाबरोबर  पाण्याची गरजही पूर्ण होत असते. व्हेलवर अनेक लोककाव्ये रचली आहेत. दमा आणि कानाच्या दुखण्यावर अमेरिकेतील मूळ रहिवासी व्हेलच्या भुकटीचा उपचार करीत. आफ्रिकेचे प्राचीन रहिवासी मानत की, व्हेल हे एकेकाळी मानवच होते. यांची हत्या हे पापकृत्य मानले जायचे. अशी हत्या झाली प्रायश्चित्त घ्यावे लागायचे.
      व्हेलच्या जबड्यात दातांच्या चार ओळी असतात. दात सारखे झिजत तुटत असतात आणि त्यांची जागा नवीन दात घेत असतात. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू असते. हत्ती आणि कांगारू या सस्तन प्राण्यातच असा प्रकार आढळतो.
  बंदिस्त अवस्थेत जन्मलेल्या एकमेव व्हेलचे नाव स्नूटी असे आहे. फ्लोरिडामधील प्राणीसंग्रहातून ह्याला आता समुद्रात सोडणे योग्य होणार नाही. मानवाला याच्याशी संपर्क करता येतो. संशोधन आणि शिक्षण या दृष्टीने हा व्हेल खूप मोलाचा आहे.
    ६० दशलक्ष वर्षांपूर्वी चार पायांचे सस्तन प्राणी असलेले यांचे पूर्वज जलवासी झाले असे मानतात. डॅालफिन, वॅालरस या सारखे एकेकाळी भूतलावर वावरणारे प्राणी का बरे जलवासी झाले असतील. माणसांपेक्षा जलवासी प्राण्यांचाच सहवास बरा असे तर त्यांना वाटले नसेल ना?

No comments:

Post a Comment