Wednesday, February 3, 2016

                 जॅार्ज इलियटचे लोकविलक्षण लौकिक व साहित्यिक जीवन

          त्यावेळी मी इंटर सायन्सच्या वर्गात असेन. एका मुलाखतीला आम्ही काही मित्र गेलो होतो. मुलाखतीत इंग्रजी साहित्याबद्दल प्रश्न विचारत आहेत, असे मुलाखत देऊन आलेल्या मित्राने सांगितले. मला एकाही इंग्रजी साहित्यिकाचे नाव माहित नव्हते. जाॅर्ज इलियटच्या एका कादंबरीचे नाव मी मित्राकडून माहित करून घेतले आणि मुलाखतीला गेलो. एका प्रश्नाच्या उत्तरात हे मी सांगितले. प्रश्नकर्त्याच्या मनात बहुदा काहीतरी शंका आली असावी. त्याने प्रश्न केला की जॅार्ज इलियट हे नाव पुरुषाचे आहे की स्त्रीचे. उत्तर काय द्यावे ते सुचेना. मुद्दाम असा प्रश्न विचारला जातो आहे त्याअर्थी तसेच काहीसे कारण असावे, असा अंदाज समयसुचकतेने बांधला आणि 'स्त्री'  हे उत्तर दिले. हे उत्तर बरोबर असल्याचे बाहेर आल्यावर कळले आणि सुटकेचा निश्वास टाकला. पण पुरुषाचे नाव टोपण नाव म्हणून लेखन करणाय्रा या लेखिकेबद्दल मनात कुतुहल होते. ते आता आतापर्यंत अधून मधून जागे होई. परवा या लेखिकेचे एक वचन सहज वाचनात आले आणि मग मात्र कुतुहल स्वस्थ बसू देईना.
बालपण
    या लेखिकेचे मूळ नाव मेरी ॲने इव्हान्स असे होते तिचा जन्म २२ नोव्हेंबर १८१९ चा तर मृत्यू २२ डिसेंबर १८८० चा. उणेपुरे ६० वर्षाचे तिचे आयुष्य अनेक घडामोडी आणि चढउताराचे गेले. तिला शिकवायला शिक्षक घरी येत. वाचनाची आणि शिकण्याची तिला लहानपणापासूनच आवड होती.तिचा स्वभाव काहीसा एकलकोंडा आणि शांत होता. मिडलमार्च या कादंबरीतील डोरोथी हे पात्र तिने स्वत:वरून बेतले असे मानतात.त्या वेळच्या तरुणींच्या स्वभावाशी तिचा स्वभाव मेळ खाणारा नव्हता. १८३६मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी आई गेली आणि मेरी पोरकी झाली. वडलांनी आईची जागा भरून काढीत तिची शिक्षणाची व वाचनाची हौस भागवली एवढेच नव्हे तर तिला जर्मन आणि इटालियन भाषाही शिकवल्या.
   वडलांशी खटका
      १८४१ मध्ये तिची गाठ चार्ल्स आणि कॅरा ब्रे या दाम्पत्याशी पडली आणि त्यांच्या माध्यमातून राल्फ इमरसन यांच्याशी तिचा परिचय झाला. तिला आपल्या वाटेवेगळेपणाची जाणीव याच काळात झाली. मुख्य म्हणजे तिचा ख्रिश्चन धर्मावरचा विश्वास उडाला. यावरून तिचे वडलांशी खटके उडू लागले. असे होते तरी तिने शेवटपर्यंत म्हणजे १८४९ पर्यंत वडलांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना साथ दिली. त्यावेळी ती  ३०   वर्षांची होती
    लेखनाला प्रारंभ
      ब्रे दाम्पत्याच्या माध्यमातूनच तिची जॅान चॅपमन नावाच्या प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्याशी खास दोस्ती जमली. वेस्टमिनीस्टर रिव्ह्यू मध्ये तिने पडद्यामागे राहून दोन वर्षे लेखन केले. या काळात तिला न मोबदला मिळाला ना प्रसिद्धी!
मुलखावेगळी जोडी
      १८५१ मध्ये तिची जॅार्ज हेन्री लेविसशी ओळख झाली. जॅार्ज लेविस तत्त्वज्ञ व समीक्षक होता. ती दोघे एकमेकाच्या प्रेमात पडली. खरे तर जॅान विवाहित होता पण तो पत्नीपासून विभक्त होता आणि पत्नी दुसर्या बरोबर राहत होती एवढेच नव्हे तर त्याच्यापासून तिला तीन मुलेही झाली होती.
     असे असूनही जॅान मेरीशी विवाह करू शकत नव्हता कारण व्यभिचारिणी असून सुद्धा त्याने पत्नीचा व्यभिचार क्षमापित( कंडोन) केला होता. त्यामुळे मेरी व जॅान तसेच एकत्र राहू लागले. व्हिक्टेरियन समाजात विवाहबाह्य संबंधांमुळे प्रचंड गहबज निर्माण झाला.टीकाकारांना चुकवण्यासाठी जर्मनीत जाऊन राहिले. तसे ब्रिटिश लोक या अशा बाबतीत उदारमतवादी समजले जातात पण हा प्रकार त्यांनाही रुचण्या पलीकडचा होता. त्यामुळे ते लंडनला परत आले आणि मेरीने आपल्याला जॅानची पत्नी मानून सौभाग्यवती लेविस म्हणावे व मानावे असा आग्रह घरला. हा प्रकार लफडे मानला गेला आणि मूळची एकलकोंडी असलेली मेरी आता आणखीनच एकटी पडली. ब्रे दाम्पत्यही तिच्यापासून दूर गेले. पण असे होते तरी मेरी आणि जॅान सुखात जगत होते.
   मेरी इव्हान्सची जॅार्ज इलियट या टोपण नावाने लिहिणाय्रा लेखिकेत रुपांतर १८५६ मध्ये झाले टोपणनावाने आणि तेही पुरुषाचे टोपणनाव घेऊन लिहिण्यामागे हे मुलखावेगळे जीवन असेल का? पण तिने आपले नाव मालतीबाई बेडेकरांप्रमाणे गुप्त ठेवण्याचा खटाटोप केला नाही( सुप्रसिद्ध मराठी लेखिका मालतीबाई बेडेकर - माहेरच्या बाळूताई खरे - विभावरी शिरूरकर या नावाने प्रगट न होता अनेक वर्षे लिहीत होत्या). मेरी 'लेविस' म्हणजेच जॅार्ज इलियट हे लवकरच उघड झाले. यामुळे तिच्या लेखनकार्याला बाधा पोचली नाही पण व्यक्ती म्हणून तिच्यावर टीकेचा भडीमार होत राहिला.
   साहित्यनिर्मिती
       १८५८ मध्ये ॲडॅम बेड, १८६० मध्ये द मिल ॲाफ द फ्लॅास, १८६१ मध्ये सायलस मार्नर, १८६३ मध्ये रोमोला१८६६मध्ये रॅडिकल, १८६९ मध्येस्पॅनिश जिप्सी हे दीर्घकाव्य असा तिचा विक्रमी व वेगवान लेखनप्रवास होता.
    मेरी ॲनेने १८६९ मिडलमार्च कादंबरी लिहायला घेतली दोन वर्षात क्रमश: प्रसिद्ध केली. हिला अफाट लोकप्रियता मिळाली. आता लोकक्षोभही शमू लागला होता. मेरी आणि जॅार्जची जोडी लोकप्रियता आणि आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे वाटचाल करू लागली. १८७८ मध्ये जॅार्ज चांगलाच आजारी पडला आणि नोव्हेंबरमध्ये मेरीला सोडून गेला. या धक्क्यातून सावरायला जवळजवळ एक वर्ष लागले.
     म्हातारी नवरी
       जॅान क्रॅास हा या जोडप्याचे व्यावसायिक हितसंबंध बघत असे. नंतरही तो हे हितसंबंध जपत असे. त्याने मेरीसमोर विवाहाचा प्रस्ताव अनेकदा ठेवला. शेवटी १८८० मध्ये तिने हा प्रस्ताव स्वीकारला. तो तिच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान होता. त्यामुळे या विवाहाला श्रृंगाराची नव्हे तर सहजीवनाची किनार होती. या विवाहानंतर केवळ सहा महिन्यांनी मेरी आजारी पडली आणि २२ डिसेंबर १८८० ला झोपेतच हे जग सोडून गेली. ती तेव्हापासून आपल्या जीवनभर साथ देणाय्रा जॅार्ज लेविसच्या शेजारी चिरविश्रांती घेत आहे.

   
टोपणनाव का घेतले?
        त्या काळात लेखन करणाय्रा लेखिका ही नवलाची बाब नव्हती. पण बहुतेक लेखिका श्रृंगारिक लेखन करीत. ते लेखन हलके फुलके होते. पण आपले लिखाण या प्रकारातले गणले जाऊ नये, अशी तिची इच्छा होती. आणखी एक लेखिका, अशी आपली ओळख निर्माण होऊ नये, अशी जबर इच्छा होती.तसेच आपल्या वैयक्तिक जीवनाची चिकित्सा होऊ नये, असेही तिला वाटत होते. ती कुरूप नव्हती पण लग्नाळू मुलीने किमान सुस्वरूपही नव्हती. म्हणूनच कदाचित तिचा आणि कुटुंबीयांचा भर शिक्षणावर होता. सौंदर्यलक्ष्मी जरी प्रसन्न नव्हती तरी सरस्वतीचा तिच्यावर वरदहस्त होता. तिचा भर स्वयंशिक्षणावर होता. शहरी ग्रामीण, गरीब श्रीमंत, धर्माधर्मातील मतभेद या सगळ्यातील ताणतणाव तिच्या वाट्याला सतत येत होते. डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रातील लेखनाच्या अनुभवामुळे तिचा व्यावसायिक लेखनक्षेत्रात मात्र प्रवेश झाला, ही एक महत्त्वाची उपलब्धी ठरली. समीक्षात्मक लिखाणाचे धडेही तिने याचवेळी गिरवले.तिची पहिली साहित्यकृती होती 'सीन्स ॲाफ क्लेरिकल लाईफ' हा लघुकथा संग्रह. लिखाण तरतांना तिने वास्तवाशी कधीही फारकत घेतली नाही. त्या काळी लेखिकांचा उल्लेख 'सिली लेडी नॅाव्हेलिस्ट ' असा उपहासात्मक रीतीने होत असे. आपली गणना त्यात होऊ नये, यासाठी ती विशेष खबरदारी घेत असे. कल्पनाविलास तिला कधीच भावला नाही. प्रत्यक्ष जीवनातील वास्तव समस्यांवर तिचा भर असे. राजे महाराजे, त्यांचे सरदार नव्हेत तर गावखेड्यातील साधी माणसे त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीसह तिच्या कादंबय्रात अवतरली आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष तिला कृत्रीम शहरी संघर्षाच्या तुलनेत तिला अधिक वास्तव वाटायचा.
  ॲडम बेडमध्ये हेस्लोप नावाच्या काल्पनिक ब्रिटिश खेड्याची पार्श्वभूमी घेऊन तिने प्रेमाच्या चतुष्कोणात गुंतलेले संबंध चित्रित केले आहेत. ही कादंबरी आजही वाचनीय ठरली आहे. असे म्हणतात की व्हिक्टोरिया राणीला ही कादंबरी इतकी आवडली होती की तिने या कादंबरीतील प्रसंग तिला पाहता यावेत म्हणून चित्रकारांची नियुक्ती केली होती.
दर्जेदार लिखाण
   चार्ल्स डिकन्स हा व्हिक्टोरियन युगातील लेखक मेरीच्या (नव्हे जॅार्जच्या )लिखाणाचा  विशेष चाहता होता. कादंबरीत ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी वास्तव,अगदी खरीखुरी, निरखलेली, पारखलेली आहे तिची महती वर्णन करणे केवळ अशक्य आहे'.जॅार्जला आपल्या लेखनाचा उद्देश सफल झाल्याची ही पावतीच होती. आता आणखी कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकताच उरली नव्हती.
  सायलस मार्नर या कादंबरीत परंपरागत धार्मिक कर्मकांडे व समजुतींवर कोरडे ओढले आहेत. चोरीचा आळ आलेल्या आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विणकराला शिक्षा म्हणून खेड्यात हद्दपार केले जाते. त्याची ही जीवनगाथा आहे.
     जॅार्जच्या काव्यप्रतिभेकडे समीक्षकांचे फारसे लक्ष गेलेले नाही. या काव्यात कथा आणि गेयता यांचा सुरेख संगम झालेला आढळतो. 'आय ग्रॅंट यू ॲंपल लीव्ह', या कवितेत अहं जपण्याच्या हव्यासापायी प्रेमिक काय आणि कायकाय करतो आहे, याचे दर्शन घडविले आहे तर इन अ लंडन ड्राॅइंगग्रूम ही कविता मनोज्ञ निसर्ग वर्णनाने  नटलेली आहे.














No comments:

Post a Comment