पुत्र सिंधूचे आणि गंगेचे
गोष्ट आहे १९८० सालची. पाकिस्थानमध्ये जिया उल हकची जुलमी राजवट सुरू होती. तसे पाहिले तर पाकिस्थानात मानवी राजवट होती कधी? पण हा इतरेजनांचा विचार झाला. पाकिस्थानातील जनतेलाही जुलमी वाटावी, अशी ही राजवट होती, असा या विधानाचा अर्थ आहे. पाकिस्थान पीपल्स पार्टीचे ( भुट्टो यांचे नेतृत्त्व असलेला पक्ष - पी पी पी हे सर्व परिचित नाव ) बहुतेक सर्व कार्यकर्ते तुरुंगात खितपत पडले होते. यापैकी चौधरी ऐहजाझ अहसन हेही एक होते. कोण आहेत हे महाशय? व्यवसायाने वकील (बॅरिस्टर) असलेले ऐहजाझ अहसन हे पी पी पीचे एक सक्रिय आणि खंदे कार्यकर्ते आणि डावीकडे झुकलेले ( साम्यवादी - कम्युनिस्ट ) घटनातज्ज्ञ आहेत. तुरुंगात असतांना पंडित नेहरूंनी (तुरुंगातच स्फुरलेले) लिहिलेले 'डिस्कव्हरी ॲाफ इंडिया' हे पुस्तक वाचत असतांना त्यांना एक अभिनव कल्पना स्फुरली. बरोबर चाळीस वर्षानंतर एका राजकीय कैद्याची एका ऐतिहासिक घटनेशी गाठभेट (ट्रिस्ट) पडत होती. निमित्त जरी नेहरूंच्या पुस्तकाच्या वाचनाचे होते तरी त्यांना पंडित नेहरूंना भावलेला 'भारताच्या एकत्वाबाबतचा रोमहर्षक दृष्टिकोन ' काही केल्या पटेना. भारत आणि पाकिस्थानचा ऐतिहासिक वारसा एकच आहे? छे! निव्वळ अशक्य!! पण मग पाकिस्थानचा ऐतिहासिक वारसा कोणता?
आम्ही कोण आहोत?
पाकिस्थानच्या निर्मितीपासून नवीन पिढीवर एक संस्कार आग्रहाने आणि सातत्याने केला जातो. आपण भारतीय नाही. भारताशी आपले काहीही नाते नाही. पण मग आपण आहोत कोण? भारत आणि पाकिस्थान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली ही एक ऐतिहासिक चूक नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया होती. कारण या दोन देशांच्या दोन भिन्न संस्कृती आहेत. त्यामुळे हे दोन जनसमुदाय तसे अगोदरपासूनच वेगळे होते. त्यामुळे ही दोन राष्ट्रे व्हावीत, ही एक नैसर्गिक प्रक्रिया म्हटली पाहिजे. एक आहे सिंधू संस्कृती आणि दुसरी आहे गंगा संस्कृती. एक आहे सिंधूच्या खोर्यातील प्रदेश तर दुसरा आहे गंगेच्या खोर्यातील प्रदेश. दोन संस्कृतीमधील हा भेद अगदी अस्सल( प्रायमाॅर्डियल) आणि नैसर्गिक आहे. ऐहजाझ अहसन यांना स्फुरलेला हा विचार, गवसलेला हा सिद्धांत अफलातून आहे, यात शंका नाही. हा सिद्धांत त्यांनी पाकिस्थानच्या 'संसदेत' मांडला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हे सहाजिकच होते कारण यामुळे पाकिस्थानला स्वत:ची अशी वेगळी ओळख मिळणार होती. 'हडप्पा आणि महेंजोदाडो' येथील संस्कृतीचे विकसित स्वरूप म्हणजे सिंधू संस्कृती, हा मुद्दा सर्वांनाच भावला.
सिंधू संस्कृती आणि गंगा संस्कृती
पण असे मानण्याबाबत अनेक लहान लहान अडचणी आहेत. ही सिंधू संस्कृती ज्या गुजराथ पर्यंत पसरली होती, तो गुजराथ आज 'गंगा संस्कृती'वाल्यांबरोबर सुखात नांदतो आहे, हे कसे? ऐहजाझ अहसन म्हणतात की, मी सिंधूपुत्र ( इंडस मॅन) आहे. उदारमतवादी, सहनशील आणि संपन्न सांस्कृतिक वारसा असलेला. या वारशात वेदांचाही समावेश होतो. हा विषय विस्ताराने आणि समग्र स्वरुपात मांडण्यासाठी ऐहजाझ अहसन यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे नाव आहे ' इंडस सागा : फ्राॅम पाटलीपुत्र टू पार्टिशन' ( सिंधूपुत्रांची शौर्यकथा: पाटलीपुत्र ते फारकत/ फाळणी ).
इतिहासाच्या आणि तर्काच्या कसोटीवर हा सिद्धांत पारखतो म्हटले तर विभाजनाचे निमित्ताने जो जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व रक्तपात झाला, त्याचा अर्थ कसा लावायचा? अनेक 'सिंधूपुत्र' आपला ' सिंधू प्रदेश' सोडून 'गंगा प्रदेशात' का गेले? असेच अनेक ' गंगापुत्र' आपला 'गंगा प्रदेश 'सोडून सिंधू प्रदेशात का गेले? यामागच्या कारणाचा शोध घेतो म्हटले तर काय आढळेल?
कच्चे दुवे
ऐहजाझ अहसन यांच्या ग्रंथात अनेक कच्चे दुवे आढळतात. ते शोधून सर्वांसमोर मांडले पाहिजेत. याबाबत ऐहजाझ अहसन यांची भूमिका विरोधाची नाही, ही बाब स्वागतार्ह आहे. कारण त्यांनी म्हटले आहे की, माझ्या या ग्रंथामुळे कदचित या विषयाच्या अध्ययनाला चालना मिळेल, असे मला वाटते. अध्ययन जरूर व्हावे, विचारमंथनाला पर्याय नाहीच/नसतोच. पण यातून जे नवनीत बाहेर पडेल, ते स्वीकारण्याची बौद्धिक प्रामाणिकता मात्र सर्वांनी दाखविली पाहिजे. पण हीच तर खरी अडचण आहे.
भारतात लोकशाही का?
तसे ऐहजाझ अहसन हे प्रामाणिक गृहस्थ वाटतात. त्यांनी आणि ब्रिटिश पार्लमेंटचे लॅार्ड मेघनाद देसाई यांनी संयुक्तरीत्या एक ग्रंथ लिहिला आहे. ग्रंथाचे नाव आहे, ' डिव्हायडेड बाय डेमॅाक्रसी'. भारतात लोकशाही नांदते आहे पण पाकिस्थानमध्ये ती का टिकत नाही? लेखनाचे निमित्ताने ऐहजाझ अहसन यांनी या शतकातून त्या शतकात प्रवेश केला आहे. त्यांनी वर्तमानकाळाबद्दल म्हटले आहे, माझ्या पक्षावर - पाकिस्थान पीपल्स पार्टीवर - सतत बंदूक रोखलेली असते. त्यांची लोकशाहीशीही लवकर गाठभेट होवो, अशी प्रार्थना करू या. भारतात लोकशाही तर पाकिस्थानमध्ये हुकुमशाही असे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, ' भारतात लोकशाही आहे याचे कारण असे आहे की, भारतात शक्तिशाली मध्यम वर्ग होता. एक राजकीय रचना ( पोलिटिकल स्ट्रक्चर ) होती. सनदी आणि सैनिकी नोकरशाहीवर ( सिव्हल ॲंड मिलीटरी ब्युरॅाक्रसी) तिची घट्ट पकड होती. या उलट पाकिस्थानमध्ये नेमकी उलट स्थिती होती. पण त्यांचे हे विधान अपूर्ण वाटते.जवळजवळ सगळ्याच मध्यपूर्वेचे लोकशाहीशी वावडे आहे. मध्यपूर्व आणि पाकिस्थान यामधील दृढभाजक ( हाय्येस्ट कॅामन फॅक्टर ) कोणता आहे? ऐहजाझ अहसन यांच्या अभ्यासाचा हा पुढील मुद्दा असावा, अशीच कोणाचीही अपेक्षा असेल.
मेघनाद देसाईंचे वेगळे मत
मात्र दर डोई एक मत असा निर्णय भारतीय राज्य घटनेने घेतला या भूमिकेला ब्रिटिश पार्लमेंटमधील लॅार्ड मेघनाद देसाई खूप महत्त्व देतात. भारतात लोकशाही यशस्वी झाली, याचे श्रेय या निर्णयाला आहे, असे ते मानतात. ब्रिटनमध्ये यशस्वी झालेले लोकशाहीचे वेस्टमिनिस्टर पद्धतीची लोकशाही ( पार्लमेंट आणि पंतप्रधान) भारताने स्वीकारली कारण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणार्या अनेक नेत्यांचे शिक्षण ब्रिटनमध्ये झाले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे मागासवर्गीय प्रथमच निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले. उच्च नीच, ग्रामीण शहरी, उत्तर भारतीय दक्षिण भारतीय असे ताण तणाव आहेत, नाहीत असे नाही. तरीही भारतीय लोकशाही या सर्वासह प्रगतीपथावर आहे.
सिंधूपुत्र आणि गंगापुत्रांचा सांस्कृतिक वारसा एकच आहे
वेद सिंधूपुत्रांचे आहेत, असे म्हणायला कुणाचीही हरकत नसावी. तसे पाहिले तर वेद विश्वाचेच आहेत. त्यांना स्थल कालाच्या मर्यादा घालता येणार नाहीत. ते जेवढे सिंधूपुत्रांचे आहेत, तेवढेच गंगा पुत्रांचेही आहेत. पाणिनीही सिंधूपुत्रच ठरतो की. तीच कथा गांधारीचीही आहे. कालयवन आणि जरासंधाच्या त्रासाला कंटाळून 'गंगापुत्र'श्रीकृष्णाने द्वारकेला ( म्हणजे सिंधू प्रदेशात) स्थलांतर केले तेव्हा 'सिंधूपुत्रांनी'विरोध केला नाही. अशी अनेक उदाहरणे शोधता/ सांगता येतील. असा शोध घेतल्यास काय आढळेल? 'सिंधूपुत्रांचा'आणि 'गंगापुत्रांचा' सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा एकच आहे. हे 'गंगापुत्रांना'कळले/कळते आहे. 'सिंधूपुत्रांना' ते कधी कळणार हाच खरा प्रश्न आहे.
वेगळेपणा दाखवण्याचा अपरिहार्य पण व्यर्थ खटाटोप
भारताचा वायव्य प्रदेश आज पाकिस्थान म्हणून ओळखला जातो. मूलत:, सांस्कृतिक वांशिक, भाषिक दृष्ट्या या भागाची स्वतंत्र व वेगळी ओळख आहे.म्हणूनच पाकिस्थानची निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. गेल्या ५००० वर्षांचा इतिहास पाहिला तर हा भाग गेली पाचशे वर्षेच भारताचा राजकीय भाग होता. त्यामुळे पाकिस्थानची निर्मती ही कृत्रिम प्रक्रिया म्हणता येणार नाही.
हरप्पन संस्कृतीच्या उदयापासून तर ब्रिटिश राजवट लागू झाली तोपर्यंतचा इतिहास हा दृष्टिकोन समोर ठेवून लेखकाने रेखाटला आहे. अखंड हिंदुस्थानची भूमिका बाळगून असणार्यांसाठी जसा हा ग्रंथ लेखकाने लिहिला आहे तसाच तो आम्ही 'अभारतीय' आहोत, हे मांडणार्या पाकिस्थान्यांसाठीही आहे. आम्ही सिंधूपुत्र आहोत आणि भारतीय गंगापुत्र आहेत, हे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा ग्रंथप्रपंच आहे. आम्ही पाकिस्थानी भारतीय नाही. पण मग आम्ही कोण आहोत? कुणीतरी असायला हवं. हिंदू मुस्लिम असा भेद करता यायचा नाही. कारण भारतात पाकिस्थानपेक्षा जास्त मुस्लिम राहतात. उद्या पाकिस्थानी हिंदुस्थानकडे आकर्षिले तर जाणार नाहीत ना? सिंधू प्रदेशाला भारताशिवाय स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही?स्वत:ची वेगळी स्वतंत्र अशी ओळख आहे किंवा नाही? अशी ओळख असलीच पाहिजे. अशी स्वतंत्र ओळख नसेल तर 'सिंधू प्रदेशाचे' वेगळे अस्तित्व टिकावे कसे? पाकिस्थानला १९४७ नंतरचा इतिहास आहे. पण त्या अगोदरच्या इतिहासाचे काय? तो इतिहास भारताच्या इतिहासापेक्षा वेगळा नसेल तर पाकिस्थानचे वेगळे अस्तित्व टिकावे कसे? या आणि अशा प्रश्नांनी पाकिस्थानमधील बुद्धिजीवी धडपडत/चाचपडत आहेत. याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे - इंडस सागा : फ्राॅम पाटलीपुत्र टू पार्टिशन' ( सिंधूपुत्रांची शौर्यगाथा: पाटलीपुत्र ते फारकत/ फाळणी ) हा चौधरी ऐहजाझ अहसन यांचा
No comments:
Post a Comment