न्यूयाॅर्क शहरात कालीमाता
वसंत गणेश काणे
एंपायर स्टेट बिल्डिंग ही अमेरिकेतील १०२ मजली महाकाय इमारत या देशाचे भूषण आहे. एंपायर स्टेट बिल्डिंगवर लुई सायहाेय आणि सहकारी यांनी विजेची रोषनाई करून कालीमातेची प्रतिकृती उभी केली आहे. ही प्रतिकृती आश्चर्यचकित करणारी एक आधुनिक करामत म्हटली पाहिजे. कालीमाता ही अंधार दूर करणारी, साक्षात कालस्वरूप मानली जाते. भूतलावरून अनेक जीवजाती नष्टप्राय होत चालल्या आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने जी जनजागरण मोहीम सुरू होती तिची सांगता अमेरिकेत एका विशेष प्रकारे झाली. अमेरिकेतील एंपायर स्टेट बिल्डिंगच्या संपूर्ण भागावर कालीमातेचे रूप साकारले होते. संपूर्ण इमारतीवर विद्युत रोषनाई अशाप्रकारे केली होती की, त्यातून कालीमातेचे दर्शन होत होते. पर्यावरणाला बाधक आचारविचार, जुन्या चुकीच्या समजुती, चालीरीती, रिवाज, भ्रामक कल्पना, असत्य, अन्याय, शोषण यांचा विनाश करणारी म्हणून कालीमाता या इमारतीवर प्रगट झाल्याचे दाखवण्याचा कलाकाराचा हेतू होता. लुई सायहाेय आणि सहकारी यांचे जेवढे अभिनंदन करावे आणि त्यांच्या योजकतेला अभिवादन करावे तेवढे थोडेच आहे. या कलाकृतीच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणासोबत जागतिक एकात्मतेचा संदेशही ते देत आहेत.
No comments:
Post a Comment