*इस्लाममध्ये बदलाचे वारे
इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फतेएल सिस्सि यांनी इस्लामी.नवीन वर्षाच्या प्रारंभी एक नाट्यपूर्ण घोषणा करून इस्लाम धर्मामध्ये क्रांती घडवून इस्लामी श्रद्धांच्या अर्थामध्ये सुधारणा करावी असे आवाहन केले आहे. सध्या हा विनाश घडवून आणणारा धर्म असून तो अन्य धर्मींयांच्या विरोधात उभा ठाकला आहे, अशी इस्लामची प्रतिमा तयार झाली आहे. ही बदलण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले आहेत. इस्लामला मवाळ बनवण्याचा हा एक धाडसी प्रयत्न आहे, असे म्हटले पाहिजे. इस्लाम धर्मातून कट्टर आणि अतिरेकी संकल्पना काढून टाकल्या पाहिजेत, असे त्यांचे आआग्रहाने मत आहे. या संकल्पनांमुळेच अल कायदा आणि इस्लामी राज्याची भूमिका घेऊन चालणरे गट जगभर हिंसा करीत सुटले आहेत. फ्रान्समधील व्यंगचित्रे प्रसिद्ध करणार्या वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसून बारा जणांची हत्या करणारे हेच गट आहेत, असे ते म्हणाले.ही घटना एक महत्त्वाची आहे, यात शंका नाही. अर्थात या आवाहनामुळे जगभरातील इस्लामला मानणार्या अतिरेकी वृत्तीच्या तरुणांचे हृदय परिवर्तन होईल, असे कुणीही मानणार नाही. पण अध्यक्ष अल सिस्सि हा विषय आपल्या राजसत्तेच्या आधारे जगातील इस्लाम धर्मीयांसमोर मांडू इच्छितात, हे मान्य केले पाहिजे.
अल अझर नावाची मशीद कैरोमध्ये आहे. त्याचप्रमाणे अल अझर याच नावाचे विद्यापीठ कैरो येथे असून याची स्थापना ९७०/९७२ मध्ये फतिमिड्सनी केली होती. हे कुराण आणि इस्लामिक कायद्यांच्या अध्ययनाचे केंद्र आहे. फतिमिड् हे इस्लाममधील प्राचीनकाळातील धर्मसत्ताधीश होते, असे गृहीत धरून चालले तरी सध्या पुरेसे होईल. कारण ह्यांचा इतिहास हा एका स्वतंत्र लेखाचा ( नव्हे ग्रंथाचा ) विषय आहे. १९५२ मध्ये इजिप्तमध्ये क्रांती झाली आणि मशिदी आणि धार्मिक संस्थांमध्ये नेमणुकी करण्याचे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतले. १९६१ मध्ये अल अझर विद्यापीठाची पुनर्रचना /सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात आले. तेव्हापासून या विद्यापीठात कट्टर आणि सनातनी उलेमांची नेमणूक केली जात नाही.
इजिप्तमध्ये बहुसंख्य मुस्लिम सुन्नी आहेत आणि सुन्नी हा सर्वात कडवा पंथ मानला जातो हे लक्षात घेतले म्हणजे इजिप्तचे अध्यक्ष अल सिस्सि यांनी जो आग्रह धरला आहे, त्याचे महत्त्व लक्षात येईल. जवळजवळ एक हजार वर्षे चालू असलेली परंपरा बदलण्याचा हा प्रयत्न आहे. इजिप्तमधील धार्मिक नेता मोहिद्दिन अफिफी यांनी पाठिंबा देतांना म्हटले आहे की, समकालीन धार्मिक साहित्याचा अभ्यास व्हावा, अशी अध्यक्ष अब्ल सिस्सि यांची इच्छा आहे. हा पाठिंबाही महत्त्वाचा आहे, कारण तो एका धार्मिक नेत्याने दिलेला आहे. अल अझर विद्यापीठाने एक वाहिनी सुरू केली आहे. हे खरे आहे की,प्रतिपादनात होत असलेला बदल तुकड्यातुकड्याने, संथ गतीने होत असून तो अनेकदा वरवरचा असतो. प्रतिपादनाचे स्वरूप सखोल, वादग्रस्त मुद्यांना स्पर्श करणारे असत नाही. ते कट्टरपंथियांना तोडीसतोड उत्तर देणारे व ज्योषपूर्ण नसते. मवाळ शब्दात प्रतिपादन करणार्या नवीन आधुनिक व्यक्ती उलेमांच्या परंपरागत वेशात नसतात.
अलअझर विद्यापीठाचे एक अधिकारी मोहिद्दिन अफिफी यांच्या मते एक महत्त्वपूर्ण बदल असा केला आहे की धार्मिक शाळांतील पाठ्यपुस्तकातून काही भाग वगळण्यात आला आहे. जसे, आता पाठ्यपुस्तकात गुलामगिरी संबंधाच्या नियमांचा पुरस्कार किंवा उल्लेख नसतो.
एक अडचण निर्माण झाली आहे खरी. हे सर्व प्रतिपादन सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्यामुळे अनेक तरूण तरुणींना अल कायद्याच्या तडाखेबाज प्रचाराचे आकर्षण अधिक वाटते आहे म्हणून अनेक शिक्षित तरूण अल कायदा किंवा इस्लामी राज्याच्या संकल्पनेकडे आकृष्ट होत आहेत.
१ जानेवारीला अल अझरच्या धर्म प्रसारकांसमोर इजिप्तच्या अध्यक्षांनी मांडलेला मुद्दा कडव्या इस्लाम धर्मीयांना विचार करायला लावणारी आहे. 'आपण हा कडवटपणा सोडला पाहिजे. अन्य धर्मीयांची एकूण संख्या आपल्या चौपट आहे. त्यांच्या विरोधात आपला निभाव लागेल का?' आपल्याला धार्मिक सुधारणा केल्याच पाहिजेत.
मात्र सनातनी धर्ममार्तंडांनी आणि अध्यक्षांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असून ते धर्म भ्रष्ट करीत आहेत, असा आरोप केला आहे. इजिप्त मधील धर्मनिरपेक्षवादींना सुद्धा राज्यसत्तेची धर्मकारणातील लुडबूड मान्य नाही. एरवी त्यांचे विचार नेमस्त स्वरूपाचेच असतात.अल वतन या वृत्तपत्राची स्तंभ लेखनिका अमीना खैरी हिने सुद्धा सरकार पुरस्कृत धार्मिक सुधारणांना विरोध केला आहे. हे वर्तमानपत्र एरवी सरकारला पाठिंबा देणारे वृत्तपत्र मानले जाते. सरकारी धार्मिक अधिकारी यांनी सुद्धा माघार घेत 'सुधारणा' आणि 'धर्मात क्रांतिकारक बदल' हे शब्द वापरणे थांबवले आहे.
अध्यक्षांनी सुद्धा असा खुलासा केला आहे की, आजच्या युगात समकालीन धर्ममतांचा अभ्यास आपण केला पाहिजे, एवढेच माझे म्हणणे आहे. गुलामगिरी, जिहाद आणि इस्लामेतर लोकांशी कसे संबंध ठेवावेत, हे मुद्दे पवित्र ग्रंथातले नसून त्या त्या काळाच्या विद्नानांची मते आहेत.त्यात काळानुरूप बदल करण्यात काहीच गैर नाही.
अफिफी हे अल अझर विद्यापीठाच्या इस्लामिक संशोधन केंद्रांचे सेक्रेटरी जनरल असून इस्लामविषलक प्रश्नांची अभ्यास करून पोलीस, सैनिक, शाळा, शासकीय तसेच खाजगी कंपन्या यांना उपदेशक ( प्रिचर्स ) पुरवणे व धार्मिक विषय स्पष्ट करून सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर संपविली आहे. सेन्साॅरशिप सुद्धा त्यांच्यावरच संपविली आहे. श्रद्धांमध्ये काळानुरूप बदल करून त्यांना अद्ययावत करण्याचा आग्रह अल सिस्सि निवडणूक प्रचातहीधरला होता. ज्या बाबींना आधुनिक जगात स्थान नाही ( नो प्लेस इन माॅडर्न लाईफ ) त्यांच बाबी पाठ्यपुस्तकातून वगळल्या आहेत. आजच्या जगात गुलामगिरीचा पुरस्कार करता येईल का किंवा ख्रिश्चन आणि ज्यू लोकांना अभिवादनही करू नका, असे म्हणून चालेल का? पाठ्यपुस्तकातून असेच मुद्दे वगळले आहेत. आता इजिप्त हे एक राष्ट्र आहे. आपण सर्व इजिप्शियन आहेत. न कुणी मुसलमान आहे न कुणी ख्रिश्चन! सगळे एकजात इजिप्शियन! 'राष्ट्रावर प्रेम करा', हे आजचे नवीन धर्ममत ( फेथ ) आहे. याचा पुरस्कार विद्यापीठापर्यंतच्या सर्व स्तरावर करण्याची आमची योजना आहे. अतिरेक्यांना /हिंसाग्रस्त जगाला हा संदेश देत असतांनाच अल सिस्सि यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर - मुस्लिम ब्रदरहुडवर- मात करण्याचीही संधीही साधली आहे. २०१३ च्या जुलै महिन्यात अल सिस्सिनी इजिप्तमधील निवडणुकींच्या मार्गाने सत्तेवर आलेली मुस्लिम ब्रदरहुडची - कट्टरपंथीयांची -राजवट उलथून टाकली. त्यावेळी ते सैन्यदलाचे प्रमुख होते. तेव्हापासून मुस्लिम ब्रदरहुडच्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी यमसदनी ( नव्हे अल्लाच्या भेटीला ) पाठविले आहे. हजारोंना तुरुंगात डांबले आहे. अतिरेकी स्वत:ला धर्मरक्षक म्हणवतात. तर आपण इस्लामचे आधुनिक, नेमस्त ( माॅडरेट ) व त्याचबरोबर धार्मिक अनुयायी आहोत, असे प्रारंभापासून म्हणत आहेत.पण असे म्हणत असतांना किंचितसा विरोधी सूर सुद्धा ते अक्षरश: चिरडून टाकीत असतात. अशा बाबतीत ते किंचितही दयामाया दाखवीत नाहीत. पण या अशा भूमिकेमुळे शासनाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या धार्मिक क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसण्याचे भीती आहे, अल सिस्सि स्वत:ला एकीकडे नेमस्त/उदारमतवादी म्हणवतात असले तरी आपल्यापेक्षा वेगळे प्रागतिक नेमस्त स्पष्टीकरण त्यांना मान्य नसते. अशावेळी ते कमालीचे कठोर आणि आडमुठे होतात. यावेळी त्यांच्या आणि अतिरेक्यांच्या भूमिकेत डावे उजवे करता येत नाही.
म्हणूनच की काय, इजिप्तमधील व्यक्तिस्वातंत्र्यवादी नेते अम्र इझ्झत यांचे मत असे आहे की, शेवटी धार्मिक आधुनिकतेचे पुरस्कर्ते आणि अल अझर यांच्यात संघर्ष अटळ आहे. आधुनिकतेवर धर्माचे नियंत्रण असावे की नसावे हा खरा कळीचा मुद्दा आहे. धर्माचे स्पष्टीकरण करणारी एकापेक्षा जास्तआणि वेगळी मते मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. अल सिस्सिच्या राजवटीत वेगळे मत मांडण्याचे स्वातंत्र्य नाही. 'अल अझर सनातन्यांवर नेहमी टीका करीत असते.पण खर्या धर्मस्वातंत्र्यवादी व्यक्तीवर तुमच्या म्हणण्याचा परिणाम होत नाही कारण त्याला माहित आहे की, अल अझर हे सुद्धा शासनाच्या ताटाखालचे मांजरच आहे. आम्हाला खरेखुरे धार्मिक स्वातंत्र्य हवे आहे', असे वाॅशिंगटनस्थित एच ए हेल्यर यांचे परखड मत आहे. ते मध्यपूर्वेतील धोरणावर नजर ठेवून असलेले एक अभ्यासक आहेत. हे काहीही असले तरीइस्लामी कट्टरपंथीयांविरुद्ध मतप्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे हे नक्की. ह्या झुळुकेचे वादळात रुपांतर कधी होईल आणि उदारमतवादी इस्लामचा अवतार कधी प्रगट होईल, याची सर्व जग वाट पाहत आहे
No comments:
Post a Comment