गोड साखरेची कडू कोडी
खासदार राजू शेट्टी आणि सदाशिवराव खोत यांना साखरेच्या प्रश्नावरून केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने शेकडो सहकार्यासोबतअटक होऊन १०,००० रुपयाच्या वैयक्तिक जामिनावर या दोघा नेत्यांची सुटका झाल्याची वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव घसरले आहेत. तशात गेल्या हंगामातील जवळजवळ ८० लक्ष टन साखर अजून शिल्लक आहे. गेल्यावेळी निर्यात केलेल्या साखरेचे पैसे आणि अनुदान अजून मिळालेले नाही. कारखाने चालविणे आणि उसाला भाव देणे ही कारखानदारांचा जबाबदारी आहे, हे खरे असले तरी सध्या शेतकरी, कारखानदार, शेतकरी संघटना आणि सरकार सगळेच एका दुष्टचक्रात अडकून पडले आहेत. यावर काही उपाय काय?
उसाला योग्य भाव मिळत नाही, जो भाव ठरतो त्यानुसार वेळेवर पैसे मिळत नाहीत, उसतोड करणार्या मजुरांनाही पुरेशा प्रमाणात आणि वेळच्यावेळी मजुरी मिळत नाही, हे आणि असे प्रश्न दरवर्षी कानावर येत असतात. भारतात किंवा महाराष्ट्रात सत्तांतर झाले म्हणून साखर उद्योगाची ( किंवा कोणत्याही उद्योगाची ) स्थिती एकदम बदलेल, असा विचार करणारे अपेक्षाभंग झाल्यामुळे केवळ अस्वस्थच नाहीत तर चिडले/संतापलेले आहेत. सद्यपरिस्थतीत साखर उद्योग फायद्यात येणे शक्यच नाही, याचे भान आपण ठेवले पाहिजे. साखरेचे भाव वाढविले तर ग्राहक नाराज होतील. तसेच खपही कमी होईल. आजची स्थिती अशी आहे की, गेल्या हंगामातलीच लाखो टन साखर पडून आहे. तिची निर्यात करावी म्हटले तर जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव उतरलेले आहेत. आपल्याला साखर तोटा पत्करूनच विकावी लागेल. साखरेचा उत्पादन खर्च कमी करणेही अशक्य आहे. मजुरी कमी करता येणार नाही. ती वाढवून मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत. शेतकर्याला भाव वाढवून हवे आहेत. त्याशिवाय लागवडीसाठी त्याने केलेला खर्च वजा जाता त्याला पुरेसे पैसे त्याचे पोट भरण्यासाठी मिळणार नाहीत. उसापासून साखर तयार करण्याच्या खर्चातही वाढ होते आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी भाववाढ केली तर ग्राहक नाराज होतो कारण भाववाढीमुळे त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडणार असते.
गोड पदार्थ आवडीने खाणार्या अनेकांना या प्रश्नांची माहितीही नसते. मात्र काही संवेदनशील मनांना हे प्रश्न अस्वस्थ करीत असणार यात शंका नाही. अशा व्यक्तींना ते खात असलेला पदार्थ गोड लागत नसणार. गोड साखरेची ही कडू कोडी त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. मा.नितीन गडकरी असेच एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हटले पाहिजे. त्यांनी या प्रश्नाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आणि साखरेला तिची गोडी परत मिळवून देण्याच्या बाबतीत चांगले यश मिळवून दिले. बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाले, उसाचे पीक घेणार्या शेतकर्यांना उसाला चांगला भाव मिळवून दिला. आमचेही बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून द्या, असा लकडा संबंधितांनी त्यांच्या मागे लावला.
हसू आणि आसू
आज पुन्हा एक वेगळाच प्रकार घडतो आहे. साखरेची भाव गडगडत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी ही अर्थातच आनंदाचीच बातमी ठरली आहे. पण साखर कारखानदारांचा तोटा होतो आहे, अशी त्यांची ओरड सुरू झाली आहे. आता उसाला भाव मिळणार नाही म्हणून उस पिकवणारा शेतकरी अस्वस्थ झाला आहे. साखरेचे भाव कमी झाले आणि ग्राहकाच्या चेहर्यावर हसू फुटले ही चांगली बाब आहे. पण त्याचवेळी शेतकर्याच्या डोळ्यात आसू यावेत, हे बरोबर नाही. सध्या जगाच्या बाजारपेठेत साखरेचे भाव गडगडले आहेत, म्हणून असे होते आहे. कारण काही का असेना, उस उत्पादकाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, असेच कुणीही म्हणेल.
साखरेचे भाव गडगडले
आता गळित हंगाम सुरू होतो आहे, अशावेळी साखरेचे भाव उतरत आहेत. त्यामुळे उसाला चांगला भाव देतां येणार नाही, असे साखर कारखानदार म्हणत आहेत तर वाढीव भाव मिळावा, असा शेतकर्यांचा आग्रह आहे. उत्तर प्रदेशात साखरेचे भाव प्रतिक्विंटल ३०२० रुपयांवरून २८५० पर्यंत उतरले आहेत. कर्नाटकात प्रतिक्विंटल २७४० रुपयांवरून २६६५ पर्यंत उतरले आहेत. तमिळनाडूत प्रतिक्विंटल ३०३४ रुपयांवरून २८२५ पर्यंत उतरले आहेत. महाराष्ट्रात प्रतिक्विंटल २७०० रुपयांवरून २६०० पर्यंत उतरले आहेत. आणखीही एक मुद्दा आहे. गेल्या हंगामातील बरीच साखर शिल्लक आहे. त्या यावर्षी साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त होणार आहे. एरवी ही आनंदाचीच बाब ठरली असती. आताही ठरायला हरकत नवहती. पण याचा परिणाम म्हणून साखरेचे भाव आणखी कमी होणार आहेत. साखर निर्यात करतो म्हणावे तर जागतिक बाजारात साखरेचे भाव उतरले आहेत, त्यामुळे ती तोटा पत्करून विकावी लागेल. परकीय चलन मिळेल हे खरे, पण शेवटी तोटा तो कोटाच.
कडू कोडे गोड होईल
गोड साखरेचे असे हे कडू कोडे आहे. हा प्रश्न जटिल आणि कूट आहे खरा. पण यावरचा उपायही मा. नितीन गडकरी यांनीच सुचवला आहे. उसाचा रस काढल्यानंतर जे चिपाड/चोयट्या आणि चोथा उरतो. यापासून इथेनॉल तयार करता येते. याची विक्री करून जास्तीचे पैसे मिळू शकतील. हे पेट्रोलमध्ये मिसळून वाहने चालविली तर पेट्रोल वाचेल, ग्राहकाचेही पैसे वाचतील, कारण इथेनाॅलचा भाव पेट्रोलपेक्षा कमी आहे. पेट्रोल आयात करण्यासाठी लागणारे परकीय चलन कमी लागेल आणि शेतकर्यांना जास्तीचे पैसेही मिळतील. 'आम के आम और गुठली के दाम' या प्रमाणे 'उस तो उस आणि इथेनाॅलची मूस', या नीतीचा अवलंब केला तर केला तर गोड साखरेचे कडू कोडे सुटेल, या शिवाय जो गाळ उरेल, त्याचे खत होऊ शकेल. आणखी जास्तीचे पैसे मिळतील. हे उत्तम आॅरगॅनिक खत आहे. रासायनिक खते घेण्याचा खर्च वाचेल, तसेच रासायनिक खतामुळे शेतजमिनीवर होणारा दुष्परिणामही टळेल. आज साखर तयार केल्यानंतरही उठणारे पदार्थ प्रदूषण वाढवत आहेत. याला आळा बसेल. उसापासून फक्त साखर तयार न करता साखरेसोबत हे दोन उपपदार्थही मिळवले तर जास्तीचे पैसे हमखास मिळू शकतील. केवळ साखर विकून मिळणार्या पैशावर अवलंबून राहण्याची वेळ राहणार नाही आणि फक्त साखरेचा लाडू सुद्धा आणखी गोड लागेल.
No comments:
Post a Comment