Wednesday, February 3, 2016

सिद्धिविनायक मंदिराचा अनुकरणीय उपक्रम

वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

सिद्धिविनायक मंदिराचा अनुकरणीय उपक्रम
   
    आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा भार उचलण्याची जबाबदारी स्वीकरून मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिराने एक अनुकरणीय व प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे.
  सिद्धीविनायक मंदिराची विश्वस्त मंडळी असे उपक्रम वेळोवेळी हाती घेत असतात. आपल्या मंदिरांनांजवळ कोट्यवधी रुपये किमतीचे धन व संपत्ती जमा आहे. भाविकजन दरवर्षी यात दरवर्षी भर घालीत असतात. परमेश्वराच्या चरणी अर्पण केली जात असलेली ही संपत्ती जनताजनार्दनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात येत असलेली पाहून भाविकांचे दान सार्थकी लागले असेच म्हटले पाहिजे. समाजहिताचे असे कार्यक्रम देशातील लहानमोठ्या सर्वच मंदिरांनी हाती घेतला पाहिजे, असे वाटते. सरकारच्या गोल्ड बाॅंड योजनेतही सिद्धीविनायक मंदिराप्रमाणे सोने गुंतवून ही मंदिरे देशाच्या प्रगतीसाठीच्या प्रयत्नात देशाची सेवाच करीत आहेत.
      देशहिताच्या कामांसाठी फार मोठ्या प्रमाणात पैसा आवश्यक आहे. कर वाढवावेत तर लोक नाराज होतात. वस्तू सेवा विधेयकासारखी विधेयके संसदेत अडकून पडली आहेत. विकासकामे पैशाअभावी अडकून राहण्याची भीती आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून आपण महाराष्ट्राचे भूषण असलेल्या, गावखेड्यापर्यंत पोचलेल्या एस टी ची वेळोवेळी उचित भाववाढ न करून अक्षरश: दुर्दशा केली आहे. (आता ती कूस बदलू लागली आहे, हे चांगले चिन्ह आहे.)
 आपण सोयी हव्यात म्हणून मागणी करतो पण त्यासाठी करवाढ केली किंवा दरवाढ केली की ओरड करतो. करापोटी घेतलेली रकम भ्रष्टाचारामुळे त्या त्या कामासाठी खर्च होत नाही  म्हणूनही लोक कर देण्यास किंवा दरवाढीस विरोध करतात. ही कोंडी फुटायची तेव्हा फुटेल पण आपत्तीच्या निवारणासाठी देशातील मंदिरे जेव्हा तत्परतेने धावून येतात, तेव्हा ते जनमानसाला एक वेगळी दिशा देण्याचे काम करीत असतात, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
 शिक्षण, आरोग्य, जलप्रबंधन, वृक्षारोपण यासारख्या बाबतीतही आपली मंदिरे फार मोठे, भरीव व पथदर्शी कार्य करू शकतात. अनेक मंदिरे अशी कामे करीतही आहेत. यात वाढ व्हावयास हवी.
    सिद्धीविनायक स्काॅलरशीप स्कीम हा एक पथदर्शी प्रकल्प ठरावा. गंगेतील पाण्याचे अर्घ्य आपण ज्याप्रमाणे गंगेलाच अर्पण करतो तसेच जनताजनार्दनाकडून दान रुपात मिळालेले धन त्याच्या कल्याणासाठी उपयोगात यावे, हा नवीन युगाचा धर्म ठरल्यास तो ईश्वरचरणी नक्कीच रुजू होईल, यात शंका नसावी.

No comments:

Post a Comment