Wednesday, February 3, 2016


वाटेवेगळी - स्वेतलाना अलेक्सिव्हिच
वसंत गणेश काणे,    
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२  
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

     २०१५ सालचे साहित्याविषयीचे नोबेल पारितोषिक स्वेतलाना अलेक्सिव्हिच हिला प्रदान करण्यात आले आहे. 'तिचे लेखन आपल्या आजच्या काळातील दु:खावर प्रकाशझोत टाकणारे आहे', या शब्दात स्विडिश ॲकॅडेमीने तिच्या लेखनाचा गौरव केला आहे. घटना जशा घडल्या व त्यांच्या प्रतिक्रिया जशा उमटल्या तशाच स्वरूपात ती जनतेसमोर ठेवीत असे, हा तिच्या लिखाणाचा विशेष होता. रशियन साम्राज्याचे पतन झाले त्यावेळी तिने हजारो व्यक्तींच्या मुलाखती त्याच्याच शब्दात नोंदवल्या आहेत. हे निमित्त तिला नोबेल पारितोषिक मिळवून देण्यासाठी विशेष कारणीभूत ठरले आहे. या काळातील दु:ख व धैर्य यांचे प्रकटीकरण तिला साधले आहे. नोबेल पारितोषिक मिळविणारी ती १४ वी महिला आहे. १९०१ साली महिलेला   पहिले नोबेल पारितोषिक मिळाले होते.
   हे पारितोषिक जाहीर होताच आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना संमिश्र स्वरुपाच्या होत्या. इव्हान बुनिन व बोरिस पॅस्टरनिक या रशियन विजेत्यांचा नावे स्मरणपटलावर उमटली व काहीसे संकोचल्यासारखेही झाले, असे ती म्हणते.
   आता या पारितोषिकाच्या निमित्ताने मिळणाऱ्या रकमेचा विनियोग  मला माझे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठी होऊन मला लेखन स्वातंत्र्याचा लाभ होऊ शकेल. कधीकधी एकेक पुस्तक लिहून हातावेगळे करण्यासाठी मला पाच ते दहा वर्षे सुद्धा लागतात.
   स्वेतलानाचा जन्म ३१ मे १९४८ साली सैनिकीपेशातील कुटुंबात झाला. वडील बेलोरुशियन तर आई युक्रेनियन होती. सैन्यातून सुटी मिळाल्यानंतर आई वडलांनी शिक्षकीपेशा तर स्वेतलानाने शिक्षण पूर्ण होताच स्थानिक वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम करण्यास प्रारंभ केला.
      लघुकथा, निबंध आणि वार्तापत्रे लिहितालिहिता तिने साहित्यातील एका नव्या वाटेने वाटचाल करण्यास सुरवात केली. ॲडेस ॲडमोव्हिच हा या लेखन प्रकाराचा जनक मानला जातो. या प्रकाराला तो कधी 'कलेक्टिव्ह नाॅव्हेल', 'नाॅव्हेल ओरेटोरिओ', 'नाॅव्हेल एव्हिडन्स', 'पीपल टाॅकिंग अबाऊट देमसेल्व्हज' अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे. या नावांवरून या लेखनप्रकाराचे नेमकेपण कळत नसले तरी वेगळेपण जाणवावे.
     गेली ४० वर्षे स्वेतलाना सोव्हिएट कालीन आणि सोव्हिएटच्या पतनानंतरच्या व्यक्तींच्या मनोभूमिकांचे चित्रण करीत राहिली. सोव्हिएटचे पतन हा इतिहास झाला. स्वेतलानाच्या चित्रणात घटनांवर भर नसे. तर या घटनेनंतर जनतेच्या भावविश्वात निर्माण होणाऱ्या कल्लोळाचा मागोवा असे. जनतेच्या भावविश्वाची सहल तिने घडवून आणलेली वाचकांना जाणवते. मग ती चेर्नोबिलचा अणुभट्टीतील अपघात किंवा अफगाणिस्थानातील सोवव्हिएट युद्ध या सारखी ऐतिहासिक घटना असेल. व्यक्तिमात्राशी संबंध येण्यासाठी या घटना केवळ निमित्तमात्र असत. मूळ उद्देश संबंधितांच्या भावविश्वात डोकावण्याचा असे. भोपाळ वायुगळतीची आठवण या निमित्ताने होते. आपल्या इथे या घटनेचे निमित्त घेऊन कुणी आपली लेखणी झिजवल्याचे आठवत नाही. कुणी असा प्रयत्न केला असेल तर तोजनतेच्या स्मरणात राहिलेला निदान दिसत तरी नाही.
      अशा घटनांचा ज्या व्यक्तींच्या जीवनांवर परिणाम झाला अशा हजारो( हो, हजारो) व्यक्तींना ( ज्यात मुले, स्त्रिया, पुरूष असे सर्व प्रातिनिधिक घटक आले) स्वेतलानाने बोलते केले व त्यांच्या भावविश्वाचा मागोवा स्वत:सोबत जनतेसमोरही उलगडून ठेवला. हे लेखन म्हणजेही इतिहासच आहे पण भावभावनांचा इतिहास आहे. आत्म्याने ( परमात्म्यासमोर) मांडलेले गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे ध्वनी स्वरुपात असल्यामळेही त्याचे वेगळेपण जाणवते.
        चेरनोबिलची अणुभट्टी फुटली. एक महिला मृत्युमार्गाला लागलेल्या आपल्या पतीच्या देहाला कवटाळून त्याच्याकडे असहाय्यतेने बघत असतांना एक नर्स तिच्याजवळ येते आणि म्हणते, 'बाईग, तुझा पती आता माणूस राहिलेला नाही, तो स्वत:च एक अणु भट्टी झाला आहे'. किंवा एक सैनिक म्हणतो आहे, 'आम्हाला इथे मदत करण्यासाठी नाही तर भट्टी विझवण्यासाठी वाळू टाकावी ना, तसे झोकून देण्यात आले आहे' अफगाण युद्धाच्या छायेत वावरणाऱे सैनिक, डाॅक्टर, विधवा, माता यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात स्वेतलाना नोंदवते आहे. कोणत्या समर्थ लेखकाच्या लेखणीतून असे प्रत्ययकारी चित्रण उतरले असेल? याचा प्रत्यय येण्यासाठी स्वेतलनाच्या 'झिंकी बाॅईज' या 'पुस्तकाचाच' आधार घ्यावा लागणार.
     'मी कुणाशीही समाजवादाबाबत चर्चा केली नाही. प्रेम, जिव्हाळा, ईर्षा, बालपण, वृद्धापकाळ हेच माझ्या चर्चेचे विषय असत. नृत्य, संगीत तर कधी हेअर स्टाईल सारखा एखादा सटरफटर विषय सुद्धा 'त्यांना' बोलतं करायला पुरत असे. एखाद्या अस्तंगत जीवनाचा मागोवा घेण्यासाठी एखादा गंभीर किंवा अगडबंब विषयच हवा असतो, असं थोडंच आहे. भर आतील चित्रावर हवा, चौकट काय कोणतीही चालते. समोरच्याला बोलते करता आले की झाले.  व्यक्तीच्या मनात शिरण्याचा हा राजमार्ग आहे'.  'सामान्यांच्या जीवनातील असामान्यत्व मला नेहमीच चकित करीत आले आहे. मानवी जीवनात असंख्य सत्ये असतात. इतिहास फक्त घटनांची नोंद घेतो. भावना त्याच्या खिसगणतीतही नसतात. इतिहासात भावनांचा समावेश अयोग्य मानतात. अशा समावेशाने इतिहासाची इयत्ता उणावते, असे म्हटले जाते. मी जगाकडे लेखिकेच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहते'.
      'वाॅर्स अनवुमनली फेस' (युद्धाचा स्त्रीसुलभ नसलेला चेहरा) हे पुस्तक या प्रकारचे एकमेव पुस्तक ठरावे. ही दुसऱ्या महायुद्धाची एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून पाहिलेली कथा शेकडो स्त्रियांच्या प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित आहे. काही लाख स्त्रिया या युद्धात आघाडीवर होत्या हे किती लोकांना माहीत असेल? या स्त्रियांच्या भावविश्वात तुम्ही शिरता तेव्हा एका चैतन्याचा अनुभव तुम्ही घेत असता. पण काही वर्षात त्या अचेतन होतात. वास्तवतेची ही जाणीव तुम्हाला स्तंभीत करते.
'दी हिस्टरी आॅफ दी रेड मॅन' या पुस्तकाबाबत म्हणतात तो गेलेला नाहीप्रत्येक सोव्हिएट नागरिकाच्या ह्रदयात तो ठाण मांडून बसला आहे. कुठलाही अवघड विषय स्वेतलानाने टाळलेला किंवा निषिद्ध मानलेला नाही.  बहुतेक वेळी या शोकांतिकाच असतात. पण प्रत्येक वेळी तिने एखाद्या सर्जनच्या अलिप्ततेने विषय हाताळला आहे. 'नथिंग बट दी ट्रुथ'  ( सत्य आणि सत्याशिवाय दुसरे काहीही नाही) हा तिचा बाणा सतत कायम राहिला आहे.
         सोव्हिएट रशियाचे विभाजन ही केवळ त्या लोकांची किंवा त्या देशापुरती सीमित शोकांतिका नाही. हा केवळ त्यांच्या मनाचा मागोवा नाही. ती मानव जातीची शोकांतिका आहे. तिचा परिणाम अंततो गत्वा मानवामानवात जवळीक निर्माण होण्यातच होईल, असे आश्वस्त करणारी ही एक भव्य शोकांतिका आहे.
       तिचे संपूर्ण लेखन हे एक मौखिक इतिहास आहे. तिची मायदेशाबद्दलची ओढ (नोस्टॅल्जिया)लपून राहिलेली नाही. तिच्या साहित्याचे वर्गीकरण करता येत नाही. तसे पाहिले तर हे कल्पित लेखन(फिक्शन) नाही. नाॅन फिक्शन ( वास्तव) आहे. पण ते कितपत रसिकमान्य ठरेल, याची शंका यायची आणि प्रकाशक ते प्रसिद्ध करायला धजावत नसत. हा आतबट्याचा व्यवहार तर ठरणार नाहीना, ही चिंता त्यांना थोपवीत असे. पण आता परिस्थती बदलली आहे. स्वेतलानाला नोबेल पारितो षिक जाहीर झाले आहे. आता तिच्या लेखनावर प्रकाशकांच्या उड्या पडतील. पण ती मात्र म्हणते आहे 'आता माझी पुस्तके छापण्याइतका पैसा आता माझ्याजवळच आहे'. असे भाग्यही किती लेखकांच्या वाट्याला आले असेल?

No comments:

Post a Comment